
गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या; कारण अस्पष्ट
नाथवाडा परिसरातील घटना; अकस्मात मृत्यूची नोंद
जळगाव :शहरातील नाथवाडा परिसरात विजय हिरामण अहिरे (३५) या तरुणाने घराच्या मागच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट असून, याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय अहिरे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करत होते. ते आईसोबत घरी टीव्ही पाहत गप्पा मारत बसले होते. काही वेळानंतर ते घराच्या मागच्या खोलीत गेले. बराचवेळ झाला तरी ते बाहेर न आल्याने आईने पाहायला गेल्यावर विजय यांनी गळफास घेतल्याचे तिच्या लक्षात आले. आईला हा धक्का बसताच शेजाऱ्यांना खबर देण्यात आली. त्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
मृताच्या भावाने, विजय यांच्यावर दबाव टाकला जात असल्यामुळे ते तणावाखाली होते आणि याच तणावातून त्यांनी आत्महत्या केली, असा आरोप केला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.