चणकापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग; नागरिकांना सावधगिरीचा इशारा

चणकापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग; नागरिकांना सावधगिरीचा इशारा
नाशिक : कळवण तालुक्यातील चणकापूर धरणातून शनिवारी रात्री पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणात ९६ टक्के पाणी साठा असून सध्या गिरणा नदीपात्रात तब्बल १५ हजार ८५८ क्युसेक पाणी सोडले जात आहे. पाणलोट क्षेत्रात सतत पावसामुळे धरणातील आवक झपाट्याने वाढत असल्याने येत्या काही तासांत टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवावा लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हरणबारी व केळझर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू असल्याने गिरणा, मौसम व आरम नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीपात्रात कोणीही जाऊ नये, तसेच पशुधन, शेतीमशागत साहित्य, मोटार पंप आदी वस्तू सुरक्षित स्थळी हलविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संबंधित शासकीय यंत्रणांना दक्ष राहण्याचे आदेश कार्यकारी अभियंता, मालेगाव पाटबंधारे विभाग यांच्या वतीने देण्यात आले असून, धरण परिसर व नदीकाठच्या भागांत नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.