जळगाव महापालिकेत पुन्हा भाजपाचा झेंडा! ४६ जागांसह महापौर कोण? उत्सुकता कायम

जळगाव मीडिया प्रतिनिधी: दि.१९ – जळगाव शहर महानगर पालिका निवडणुकीत महायुतीचा डंका वाजला असून महापौर पदाच्या सोडतीचे आरक्षण अद्याप जाहीर झालेले नाही. दरम्यान, जर खुल्या गटासाठी आरक्षण निघाल्यास भाजपकडून काही नावे समोर येत आहेत. जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांचे नाव त्यात आघाडीवर आहे.
जळगाव शहर मनपा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळाले. महापौर भाजपचा होणार की शिवसेनेचा हे अद्याप निश्चित नसले तरी मोठा भाऊ म्हणून भाजपाचा महापौर होणार हे नक्की आहे. महापौर पदाचे आरक्षण खुल्या गटासाठी जाहीर झाले तर काही नावे भाजपच्या गोटातून समोर येत आहे.
मनपातील जेष्ठ नगरसेवक आणि माजी महापौर नितीन लढ्ढा यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. एक अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ओळख असून माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांचे देखील नाव पुढे येत असून त्या माध्यमातून मराठा समाजाचा महापौर देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मंत्री गिरीश महाजन यांचे विश्वासू अरविंद देशमुख यांच्या देखील नावाची चर्चा सुरु झाली असून पहिल्यांदाच ते मोठे मताधिक्य घेऊन विजयी झाले आहेत.
महापौर पदाचे महिला वर्गासाठी आरक्षण जाहीर झाल्यास जेष्ठ नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, प्रतिभा देशमुख, मोठा राजकीय वारसा लाभलेल्या कुटुंबातील युवा चेहरा म्हणून मानसी भोईटे आणि आ.मंगेश चव्हाण यांचे निकटवर्तीय अमित पाटील यांच्या पत्नी वैशाली पाटील यांच्या देखील नावाची चर्चा आहे.




