
मध्य प्रदेशातील दोन संशयितांकडून गावठी कट्टे जप्त, १.७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जळगाव: मध्य प्रदेशातील खरगोन येथील दोन संशयित गावठी कट्टे विक्रीसाठी जळगाव जिल्ह्यात येत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोन गावठी कट्टे, दोन मोटारसायकलींसह १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी उत्सव काळात शस्त्रांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईस सुरुवात केली. ८ जून रोजी सहायक फौजदार रवी नरवाडे आणि पो. हेड कॉन्स्टेबल गोपाळ गव्हाळे यांना गोपनीय माहिती मिळाली की, मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील भगवानपूरा तालुक्यातील सिरवेल गावातील दोन व्यक्ती गावठी कट्टे विक्रीसाठी रावेर तालुक्यामार्फत जळगावात येत आहेत.वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने, ज्यामध्ये पो. उपनिरीक्षक शरद बागल, सहायक फौजदार रवी नरवाडे, पो. हेड कॉन्स्टेबल गोपाळ गव्हाळे, नितीन चाविस्कर, बबन पाटील आणि चालक पो. हेड कॉन्स्टेबल दीपक चौधरी यांचा समावेश होता,
रावेर तालुक्यातील पाल परिसरातील जंगलात सापळा रचला.मिळालेल्या माहितीप्रमाणे, पथकाने फॉरेस्ट नाका पाल येथे सापळा लावला. यावेळी TVS RAIDER (क्र. MP-10-ZC-9650) आणि TVS SPORT (क्र. MP-10-MV-1462) या दोन काळ्या मोटारसायकलींवर दोन संशयित आले. एका संशयिताने डोक्याला निळी पगडी बांधली होती.
पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, ते पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, पथकाने पाठलाग करून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले.या कारवाईत दोन गावठी कट्टे आणि मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. ही कारवाई जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि अवैध शस्त्रास्त्रांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे