
मनपामध्ये तिसऱ्या दिवशी ४२४ उमेदवारी अर्जांची विक्री; एक अर्ज दाखल
तीन दिवसांत १ हजार ८१९ अर्जांची विक्री
जळगाव प्रतिनिधी : जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी तिसऱ्या दिवशीही अर्ज दाखल करण्याबाबत उमेदवारांची सावध भूमिका दिसून येत आहे. शुक्रवार दि. २६ डिसेंबर रोजी तब्बल ४२४ उमेदवारी अर्जांची विक्री झाली असली, तरी दिवसभरात केवळ एकच नामनिर्देशन अर्ज दाखल झाला आहे.
महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याचे अर्ज विक्रीच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. दि. २३ डिसेंबरपासून अर्ज विक्री आणि अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली. पहिल्याच दिवशी ७७७ अर्जांची विक्री झाली होती, मात्र एकही अर्ज दाखल झाला नव्हता. दुसऱ्या दिवशी ६१८ अर्जांची विक्री झाली, तरी अर्ज दाखल झाले नाहीत. तिसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवार दि. २६ डिसेंबर रोजी शहरातील १९ प्रभागांमध्ये एकूण ४२४ उमेदवारी अर्जांची विक्री झाली. अशा प्रकारे अवघ्या तीन दिवसांत एकूण १ हजार ८१९ उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे.
तिसऱ्या दिवशी प्रभागनिहाय अर्ज विक्री
तिसऱ्या दिवशी झालेल्या अर्ज विक्रीत प्रभाग क्रमांक ०३ मध्ये सर्वाधिक ४१ अर्जांची विक्री झाली. प्रभाग क्रमांक ०८ मध्ये ३७, प्रभाग क्रमांक १० मध्ये ३६, प्रभाग क्रमांक १२ मध्ये २९ अर्जांची विक्री झाली. प्रभाग क्रमांक १४ मध्ये २८, १६ मध्ये २७, १७ मध्ये २४, १५ मध्ये २३, ०५ व ०६ मध्ये प्रत्येकी २२, ०४ व ०९ मध्ये प्रत्येकी २०, ०२ मध्ये १९, ०७ व १३ मध्ये प्रत्येकी १५, ०१ व १९ मध्ये प्रत्येकी १३, ११ मध्ये ११ आणि प्रभाग क्रमांक १८ मध्ये ९ अर्जांची विक्री नोंदविण्यात आली आहे.
दरम्यान, अर्ज भरण्याची प्रक्रिया किचकट असल्याने तसेच चुका टाळण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार अंतिम दिवसांची प्रतीक्षा करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता असून, महापालिका निवडणुकीची खरी रणधुमाळी आता वेग घेऊ लागल्याचे स्पष्ट झाले आहे.




