गुन्हेजळगाव

रुईखेडा येथे विजेचा धक्का बसून कंत्राटी कामगाराचा मृत्यू

रुईखेडा येथे विजेचा धक्का बसून कंत्राटी कामगाराचा मृत्यू

विद्युत पुरवठा अचानक सुरू झाल्याने दुर्दैवी घटना, नातेवाईकांचा महावितरणवर निष्काळजीपणाचा आरोप

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : तालुक्यातील रुईखेडा गावात रविवारी (११ मे) सकाळी ११ वाजताच्या सुमारास विजेच्या धक्क्याने एका कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. महावितरण कंपनीच्या वतीने इलेक्ट्रिक पोलवर दुरुस्तीचं काम सुरू असताना अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने ही घटना घडली.

या अपघातात नितेश अशोक पाखरे (वय २२, रा. टाकळी, ता. मुक्ताईनगर) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. नितेश याने आयटीआय शिक्षण पूर्ण करून मागील दीड महिन्यांपासून अग्रवाल कंपनीच्या ठेकेदारामार्फत महावितरणमध्ये कंत्राटी कामगार म्हणून सेवा सुरू केली होती.

रविवारी सकाळी रुईखेडा येथे पोल दुरुस्तीचं काम करत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाला. यामुळे नितेशला जोरदार विद्युत धक्का बसला आणि तो जमिनीवर कोसळला. घटनास्थळी उपस्थित सहकाऱ्यांनी त्याला तातडीने मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. महावितरणच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

मृत्यूमुळे पाखरे कुटुंबावर शोककळा पसरली असून त्यांच्या डोळ्यांदेखत भविष्य उभं करणारं सोनं अचानक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button