
डिक्कीतील दोन लाखांची चोरी; निवृत्त कर्मचाऱ्याची रक्कम लंपास
चाळीसगाव (प्रतिनिधी) – शहरातील भडगाव रोडवरील अंधशाळेजवळ दुचाकीची डिक्की उघडून चोरट्यांनी दोन लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना गुरुवारी (दि. १२ जून) दुपारी उघडकीस आली. निवृत्त कर्मचाऱ्याने बँकेतून रक्कम काढून ती डिक्कीत ठेवली होती. मात्र, जांभूळ खरेदी करताना ही फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
संत रोहिदास सोसायटी येथे राहणारे शिरीषकुमार भास्कर लिंडायत (वय ७२) हे निवृत्त कर्मचारी असून, त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने त्यांनी स्टेट बँकेच्या कृषी शाखेतून सुनेच्या खात्यातील धनादेश वटवून दोन लाख रुपये काढले. ही रक्कम त्यांनी आपल्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवली आणि घरी परतत होते.
दरम्यान, भडगाव रोडवरील अंधशाळेजवळ लोटगाडीवर जांभूळ खरेदी करताना त्यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला लावली. जांभूळ घेतल्यानंतर डिक्की उघडून त्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करत असताना डिक्कीत ठेवलेली दोन लाखांची रक्कम गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
शिरीषकुमार लिंडायत यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.