
पाय कृत्रिम असला तरी जगण्यातील आनंद खरा – माजी प्रांतपाल डॉ. झुणझुणवाला
रोटरीतर्फे १०० कृत्रिम पायांचे मोफत वितरण
जळगाव – पाय कृत्रिम असला तरी गरजूंच्या जीवन जगण्यातील आनंद हा खरा आहे, असे रोटरी डिस्ट्रिक्टचे माजी प्रांतपाल डॉ. आनंद झुणझुणवाला यांनी प्रतिपादन केले. रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट आणि रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण यांच्या संयुक्त विद्यामाने रविवार १४ रोजी मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे झालेल्या मोफत कृत्रिम पाय वितरण शिबिरात ते बोलत होते.
व्यासपीठावर रोटरी वेस्टचे अध्यक्ष गौरव सफळे, सचिव देवेश कोठारी, रोटरी न्यू कल्याणचे अध्यक्ष धीरेंद्र सिंह, मानद सचिव नामदेव चौधरी, प्रकल्प प्रमुख योगेश भोळे व पंकज झांबरे आणि आरडीसी चेअरमन किरण पाटील, सहसचिव सचिन वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.
मोफत कृत्रिम पाय वितरणासाठी २० ऑगस्टपर्यंत नाव नोंदणी करण्यात आली, तर २४ ऑगस्ट रोजी पायांचे माप घेण्यात आले होते. त्यातील ८८ व्यक्तींना १०० कृत्रिम पाय बसविण्यात आले. यासाठी ॲटॉस कंपनीच्या सीएसआर अंतर्गत आर्थिक सहकार्य मिळाले.
काही व्यक्तींना दोन्ही कृत्रिम पाय बसविण्यात आले. खानदेशासह विदर्भ, मराठवाडा आणि शेजारी मध्य प्रदेश व गुजरात राज्यातील व्यक्तींनी या शिबिरात सहभाग घेतला.
डॉ. सुरेंद्र सिंग, हर्षित सिंग, प्रीतम पाटील यांनी पाय बसविण्याची (फिटिंग) जबाबदारी सांभाळली. प्रकल्प प्रमुख योगेश भोळे यांनी प्रास्ताविक केले.
गौरव सफळे व धीरेंद्र सिंह यांनी मनोगत व्यक्त केले. पंकज झांबरे यांनी आजपर्यंतच्या ४ हजार व्यक्तींना कृत्रिम पाय वितरणाची माहिती दिली. रोटरी वेस्टच्या माजी अध्यक्षांच्या हस्ते डॉ. झुणझुणवाला यांचा सत्कार करण्यात आला.
यशस्वीतेसाठी रोटरी जळगाव वेस्टचे व रोटरॅक्ट जळगाव वेस्टचे सर्व सदस्य, गोदावरी मेडिकल कॉलेजचे फिजिओथेरपिस्टचे विद्यार्थी, शिक्षा अकॅडमीतील इंटरॅक्ट क्लबचे विद्यार्थी, रोटरी वेस्टच्या सदस्यांचे कुटुंबीय यांनी परिश्रम घेतले.
बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील पाच वर्षीय उमरेन दानिश देशमुख याला अपघातानंतर एक वर्षाने कृत्रिम पायावर उभे राहताना मनात भीती आणि चेहऱ्यावर आनंदी भाव उमटत असल्याची भावना त्याच्या आजोबा व आईने व्यक्त केली.
धरणगाव तालुक्यातील रेल या गावातील रखमाबाई विठ्ठल पाटील यांनी जगण्याची जिद्द मिळाली अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
भुसावळ येथील ७४ वर्षीय अशोक इंगळे यांनी रेल्वेत नोकरी करताना अपघातात पाय गेला. २०११ पासून दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही, पण या कृत्रिम पायामुळे घरातील माझे सर्व वैयक्तिक कामे मी करू शकेल असा आत्मविश्वास व्यक्त केला. शिबिरामुळे ५ वर्षांच्या लहान मुलां पासून ८५ वर्षांच्या वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच या कृत्रिम पायाचा फायदा झाला.