जळगावराजकारणशासकीय

भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे; -जिल्हाधिकारी रोहन घुगे

भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे; -जिल्हाधिकारी रोहन घुगे

150 वर्षे पुर्ण झाल्या निमित्त “वंदे मातरम् ” गीताचे सामुहिक गायन

जळगाव प्रतिनिधी भारत देशाप्रती आपले जे कर्तव्य आहे ते आपण बजावले पाहिजे धर्म, जाती, प्रांत, भाषा यामध्ये विभागून न जाता आपण एकत्र आहोत, असा एकतेचा संदेश जगाला सर्वांनी दिला पाहिजे. भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी आपण सर्वांनी जे स्वप्न पाहिले आहे ते साकार करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, विकसित भारत घडवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले.

“वंदे मातरम् “या गीतास 150 वर्षे पूर्ण झाल्या निमित्त, शासनाच्या कौशल्या रोजगार, उद्योजगता विभाग आणि नाविण्यता विभाग, सास्कृतिंक कार्य विभाग याच्या संयुक्त विद्यमाने पोलीस कवायत मैदानांवर आयोजित वंदे मातरम गीताचे सामुहिक गायन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी, महानगरपालीका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे कार्यक्रमाचे वक्ते अशोक पाटील, तहसिलदार शितल राजपुत, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एन.व्ही चव्हाण, प्राचार्य वाय.के.कुलकर्णी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, “वंदे मातरम्” हे केवळ एक गीत नाही, तर भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा आत्मा आहे. विविध धर्म, जाती, भाषा आणि प्रांत यांना एकत्र आणणारा एकतेचा मंत्र या गीतातून आपल्याला मिळाला. स्वातंत्र्य चळवळीत “वंदे मातरम्”या जयघोषाने संपूर्ण भारत एकवटला आणि असंख्य थोर पुरुष, हुतात्म्यांना बलिदानासाठी स्फुरण मिळाले. आपण जो भारत बघतोय तो भारत मिळण्यासाठी या गीताचे योगदान फार मोठया स्वरुपात आहे. आजच्या या सोहळ्याचे उद्दिष्ट म्हणजे इतिहासाची पुन्हा आठवण करून देऊन आपण आपले कर्तव्य बजावले पाहिजे. या गीताला आज 150 वर्षे पुर्ण झाल्यानिमित्त संपुर्ण राज्यामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला आहे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात प्रमुख वक्ते अशोक पाटील म्हणाले की, वंदे मातरम हे गीत नाही, तर तो तुम्हा-आम्हा भारतीयांचा हजारो वर्षांचा एक भाव आहे, तो एक स्व आहे, ती आमची स्व-चेतना आहे. या राष्ट्रामध्ये, स्वातंत्र्याच्या युद्धात, अनेक महापुरुषांनी आपल्या स्वतःच्या देहाचा त्याग केला आणि अशातच, 7 नोव्हेंबर 1875 रोजी, एक वेद वाणीला स्पर्श करेल असा एक मंत्र जो सात करोड लोकांना एकत्र आणतो, एका छताखाली आणतो, आणि एक ऊर्जा, एक जाज्वल्य आणि एक तेज निर्माण करतो, आणि अख्खा देश एका छताखाली येतो, हे तेज, हा स्व, या चेतनेचा भाव, ज्या गीतातून प्रगट झाला, ते गीत आणि त्याचा जन्मोत्सव आपण आज साजरा करत आहोत, असे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर व शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी वंदे मातरम गीताचे सामुहिक गायन केले. या वेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी विद्यार्थिनींनी लघुनाटिका सादर केली.

या कार्यक्रमाला विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शहरातील विविध शाळेचे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच एन.सी.सी., आर.एस.पी, स्काऊट गाईड विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button