
जळगाव जिल्ह्यासाठी CIIIT केंद्राला मंजुरी
युवकांसाठी जागतिक दर्जाचे प्रशिक्षण उपलब्ध
टाटा टेक्नॉलॉजीचे सहकार्य; दरवर्षी ३ हजार विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षणाची संधी
जळगाव प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक आणि तांत्रिक प्रगतीला मोठी गती मिळण्याची शक्यता वाढली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विविध स्तरांवरील समन्वयातून CIIIT – सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग केंद्राला जळगावमध्ये मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पासाठी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीनेही पूर्ण सहकार्य देण्यास संमती दर्शवली आहे.
या केंद्रामुळे जिल्ह्यातील युवकांसाठी जागतिक दर्जाचे औद्योगिक प्रशिक्षण उपलब्ध होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादन प्रक्रिया, डिझाईन आणि संशोधन यांसारख्या क्षेत्रांत प्रशिक्षण मिळाल्याने युवकांना जिल्ह्यातच रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. कुशल मनुष्यबळ सहज उपलब्ध झाल्याने जळगाव परिसरातील औद्योगिक विकासालाही चालना मिळेल, असा अंदाज आहे.
CIIIT केंद्र सुरु झाल्यानंतर दरवर्षी सुमारे ३,००० विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची सुविधा मिळणार आहे. जिल्ह्याच्या औद्योगिक, आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी हे केंद्र महत्त्वाचा मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.




