
जळगाव मनपा निवडणूक : भाजपपाठोपाठ शिवसेनेचाही ‘बिनविरोध’ धमाका; प्रभाग १८ ‘अ’ मधून गौरव सोनवणे बिनविरोध
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग १८ ‘अ’ (अनुसूचित जमाती राखीव) मधून शिवसेनेचे उमेदवार गौरव चंद्रकांत सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या विजयामुळे शिवसेना गोटात उत्साहाचे वातावरण असून कार्यकर्त्यांनी महापालिका परिसरात जल्लोष साजरा केला.
प्रभाग १८ ‘अ’ या अनुसूचित जमाती जागेसाठी गौरव सोनवणे यांच्यासह मयूर चंद्रशेखर सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत मयूर चंद्रशेखर सोनवणे यांनी आपली माघार घेतल्याने गौरव सोनवणे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब केले.
आमदारपुत्राचा राजकारणात दमदार प्रवेश
बिनविरोध निवडून आलेले गौरव सोनवणे हे चोपडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे सुपुत्र आहेत. उच्चशिक्षित आणि सामाजिक कार्याची पार्श्वभूमी असलेल्या गौरव सोनवणे यांच्या रूपाने शिवसेनेने एका युवा नेतृत्वाला संधी दिली होती. त्यांच्या या बिनविरोध निवडीमुळे शिवसेनेने महापालिकेत आपली ताकद अधोरेखित केली असून, आगामी काळात ही निवडणूक अधिक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.




