
मतदान दिनी भरपगारी सुट्टी बंधनकारक; नियम मोडणाऱ्यांवर तात्काळ कारवाई
जळगाव (प्रतिनिधी): लोकशाहीचा कणा असलेल्या मतदान प्रक्रियेत प्रत्येक नागरिकाचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी देणे कायद्याने अनिवार्य असल्याचे जळगाव जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मतदान दिनी कर्मचाऱ्यांना सुट्टी न दिल्यास किंवा मतदानासाठी आवश्यक सवलत न दिल्यास तक्रारीवर तात्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
राज्य निवडणूक आयोगामार्फत १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या जळगाव शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ मधील कलम १३५ (बी) नुसार, निवडणूक क्षेत्रातील सर्व पात्र मतदारांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक आहे. निवडणूक क्षेत्रातील मतदार असलेले अधिकारी, कर्मचारी व कामगार, जरी ते कामानिमित्त क्षेत्राबाहेर कार्यरत असले, तरी त्यांनाही मतदानासाठी ही सवलत देणे आवश्यक राहणार आहे.
हा आदेश उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय, निमशासकीय तसेच खासगी आस्थापना, कारखाने, दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने, खासगी कंपन्या, हॉटेल्स, खाद्यगृहे, मॉल्स, रिटेल आस्थापना, आयटी कंपन्या तसेच रुग्णालये व दवाखाने यांना लागू राहणार आहे. अत्यावश्यक व लोकोपयोगी सेवांमध्ये पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसल्यास, संबंधित कर्मचाऱ्यांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची विशेष सवलत देणे नियोक्त्यांवर बंधनकारक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या १० डिसेंबर २०२५ रोजीच्या शासन परिपत्रकानुसार या नियमांची अंमलबजावणी केली जाणार असून, उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सहाय्यक कामगार आयुक्त डॉ. रा. दे. गुन्हाने यांनी सांगितले. लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी कोणताही मतदार वंचित राहू नये, यासाठी सर्व नियोक्त्यांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.




