
जळगाव मनपाचा रणसंग्राम: आज पिंप्राळ्यात महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा
रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रचाराचा श्रीगणेशा
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून, महायुतीच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ आज रविवार, ४ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात होत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पिंप्राळा येथील भवानी मंदिर येथे प्रचाराचा नारळ फोडला जाणार असून, त्यानंतर सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महायुतीची प्रचंड जाहीर सभा पार पडणार आहे. या सभेच्या माध्यमातून महायुतीने निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून शहरात राजकीय वातावरण तापले आहे.
या ऐतिहासिक सोहळ्यासाठी महायुतीचे सर्व दिग्गज नेते एकाच मंचावर येणार आहेत. यामध्ये राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, माजी मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिताताई वाघ, माजी मंत्री आमदार अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार सुरेश (राजू मामा) भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार किशोर पाटील, आमदार अमोल जावळे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार अमोल पाटील यांच्यासह महायुतीचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. नेत्यांच्या या मांदियाळीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.
महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीने कंबर कसली असून, प्रचाराच्या या शुभारंभ प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष संजय पवार आणि रिपाइं (आठवले गट) जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल यांच्यासह महायुतीचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. पिंप्राळा येथील भवानी माता मंदिरात सायंकाळी ५ वाजता धार्मिक विधी व नारळ फोडून प्रचाराला अधिकृत सुरुवात केली जाईल आणि त्यानंतर लगेचच भव्य जाहीर सभेला सुरुवात होईल. जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि महायुतीच्या विजयाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी या ऐतिहासिक सभेला महायुतीचे उमेदवार, सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, विष्णू भंगाळे आणि संजय पवार यांनी केले आहे.




