
महायुतीत ‘ऑल इज वेल’ की नाराजीचा स्फोट?; विधानपरिषद अर्जभरतीत शिंदे सेनेची दांडी, बंडखोरीने वाढवली धडधड!
नंदू महाजनांच्या उमेदवारीवेळी पालकमंत्र्यांसह प्रमुख नेते गैरहजर; रेश्मा काळेंची अपक्ष एन्ट्री, चौधरी कुटुंबही रिंगणात
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव विधानपरिषद निवडणुकीने पहिल्याच टप्प्यात राजकीय रंगत कमालीची वाढवली असून महायुतीतील अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीचे उमेदवार नंदकिशोर (नंदू) महाजन यांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. मात्र यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह शिंदे सेनेचे अनेक प्रमुख आमदार आणि पदाधिकारी गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
जळगाव विधानपरिषदेची जागा मिळवण्यासाठी भाजप आणि शिंदे सेना यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार रस्सीखेच सुरू होती. शिवसेनेकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील हे प्रमुख इच्छुक मानले जात होते. मात्र महायुतीच्या जागावाटपात ही जागा भाजपच्या वाट्याला गेल्यानंतर पक्षाने नंदकिशोर महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
महाजन यांच्या उमेदवारी अर्जावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, आमदार अमोल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्यासह भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. मात्र शिंदे सेनेचे अनेक प्रमुख चेहरे अनुपस्थित राहिल्याने नाराजीच्या चर्चांना बळ मिळाले.

दरम्यान, महायुतीसाठी आणखी एक धक्का म्हणजे शिंदे गटाच्या नगरसेविका रेश्मा कुंदन काळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरीचे संकेत दिले आहेत. आपण बंडखोर नसून महिलांना प्रतिनिधित्व मिळावे या उद्देशाने निवडणूक लढवत असल्याचा दावा त्यांनी केला असला तरी त्यांच्या उमेदवारीमुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे शरद तायडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ, कुलभूषण पाटील, काँग्रेसचे अविनाश भालेराव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होईल, असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला.
या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांनीही रंगत वाढवली आहे. भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांचे पुत्र सचिन चौधरी आणि बंधू अनिल चौधरी यांनी स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केल्याने लढत अधिक चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अर्ज दाखल प्रक्रियेदरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रशासनावर दुजाभावाचा आरोप केला. भाजप कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात प्रवेश देण्यात आला, मात्र महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मर्यादित प्रवेश दिल्याची तक्रार यावेळी करण्यात आली.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी एकूण १६ उमेदवारांनी अर्ज भरले. यापूर्वी ६६ इच्छुकांनी तब्बल ९९ अर्ज खरेदी केले होते. आता अर्ज छाननी आणि माघारीनंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, इच्छुक असतानाही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलेल्या युवा नेते प्रताप पाटील यांनी महायुती धर्माचे पालन करणार असल्याचे स्पष्ट केले. तर मंत्री गिरीश महाजन यांनी नंदकिशोर महाजन यांची उमेदवारी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी अंतिम केल्याचा गौप्यस्फोट करत त्यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
जळगाव विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीतील नाराजी, बंडखोरी आणि अपक्षांची एन्ट्री यामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून येत्या काही दिवसांत घडामोडींना आणखी वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत.



