आता सर्व शासकीय सेवा घरबसल्या मिळणार ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई I वृत्तसंस्था
राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्यासाठीची ऑनलाईन प्रणाली विकसित करा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. 16 जानेवारी) राज्य मंत्रिपरिषदेच्या बैठकीत बोलताना दिल्या. राज्यातील विविध विभागांच्या 969 सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी आपले सरकार पोर्टलवर 536 सेवा उपलब्ध आहेत. 90 सेवा संबंधित विभागांच्या पोर्टलवर उपलब्ध आहेत. मात्र सुमारे 343 सेवा ऑफलाइन पध्दतीने दिल्या जातात. मात्र या सर्वच सेवा आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध करून द्याव्यात. ज्या सेवा सध्या ऑफलाइन पध्दतीने दिल्या जातात त्या सर्व ऑनलाइन करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन फडणवीस यांनी केले.
शासकीय सेवा ऑनलाइन देण्याचे काम येत्या 100 दिवसात पूर्ण करा. अनेक सेवा अधिसूचित करण्यात आलेल्या नाहीत. त्या सर्व सेवा अधिसूचित करण्यासाठी संबंधित मंत्री आणि सचिवांनी पुढाकार घ्यावा. नागरिकांना सुमारे 99 टक्के शासकीय सेवा मोबाइलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या पाहिजेत. यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात वारंवार जाण्याची आवश्यकता भासणार नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले. राज्यात आपण ईज ऑफ डूईंग बिझनेस संकल्पनेवर काम करण्यावर भर देत आहोत. त्यानुसार अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यावर भर दिला पाहिजे. क्षेत्रीय स्तरावरील अधिकार राज्य सरकारकडे केंद्रीत केले जाऊ नये, अशा स्पष्ट सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत.