भुसावळमध्ये तृतीयपंथीयास खंडणीसाठी धमकी; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

भुसावळमध्ये तृतीयपंथीयास खंडणीसाठी धमकी; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील खडका रोड, सत्यसाई नगर परिसरात राहणाऱ्या अशपाक उर्फ अम्रपाली जावीर बागवान (वय ३२) या तृतीयपंथीयास सहा ओळखीच्या तृतीयपंथीयांसह एका पुरुषाने जिवे मारण्याची धमकी दिल्याची आणि दररोज हफ्ता न दिल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याची तक्रार बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
ही घटना ४ जून रोजी रात्री साडेअकरा वाजता अम्रपाली यांच्या राहत्या घरी घडली. अम्रपाली या जोगवा मागून व किरकोळ कामांद्वारे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. या दरम्यान विजय सोनर, भावेश उर्फ भावना, अश्विनी उर्फ आशु, श्रावण बाविस्कर, राजेश उर्फ राखी तुळशीराम सूर्यवंशी, आकाश उर्फ रुपाली आणि नितीन उर्फ गोलू संगत हे सात जण वारंवार त्यांच्या घरी येऊन त्रास देत होते, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकही भीतीपोटी तक्रार करण्यास टाळाटाळ करीत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. संबंधित सात जणांविरोधात खंडणी व जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय परेश जाधव करीत आहेत.