जळगाव मनपावर महायुतीचाच झेंडा फडकणार

जळगाव मनपावर महायुतीचाच झेंडा फडकणार
७५ पैकी ६५ जागांवर विजयाचा दावा; गिरीश महाजनांचा आत्मविश्वास
जळगाव प्रतिनिधी : जळगाव महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजप–शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती सत्तेवर येणार असून, ७५ पैकी किमान ६५ जागांवर महायुतीचा विजय निश्चित आहे, असा ठाम विश्वास संकटमोचक मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. जळगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महायुतीच्या जागावाटपापासून ते उमेदवार निवडीपर्यंतच्या प्रक्रियेबाबत महत्त्वाचे संकेत दिले.
महाजन यांनी सांगितले की, भाजप आणि शिवसेना यांच्यातील जागावाटप जवळपास अंतिम टप्प्यात आले असून, राष्ट्रवादी काँग्रेससोबत काही जागांबाबत चर्चा सुरू आहे. उद्या मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत निर्णायक बैठक होणार असून, दुपारी १२ वाजेपर्यंत महायुतीचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर महायुतीचा अंतिम फॉर्म्युला व अधिकृत घोषणा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मागील महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे ५७ तर शिवसेनेचे १८ नगरसेवक निवडून आले होते. यंदा मात्र दोन्ही पक्ष परस्पर समन्वयाने निवडणूक लढवणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसला ५ ते ८ जागा देण्याबाबत प्राथमिक सहमती होत असल्याची माहिती मंत्री महाजन यांनी दिली. जागावाटप ठरवताना उमेदवारांची जिंकण्याची क्षमता, स्थानिक राजकीय समीकरणे आणि संघटनात्मक ताकद या बाबींचा विचार केला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
महायुतीमुळे काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होण्याची शक्यता असली, तरी योग्य वेळी सर्वांचे पुनर्वसन केले जाईल आणि निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पक्षासाठी सातत्याने काम करणाऱ्यांना संधी देण्याची भूमिका भाजपची स्पष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मागील पंचवार्षिक निवडणुकीत भाजपकडून निवडून येऊन नंतर बंडखोरी करत शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांना उमेदवारी देण्यास भाजपचा स्पष्ट विरोध असल्याचे मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले. पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांबाबत भाजपची भूमिका कठोर राहील, असे संकेत त्यांनी दिले.
जळगाव महानगरपालिकेची निवडणूक येत्या १५ जानेवारी रोजी होणार असून, भाजपकडून तब्बल ६०० इच्छुक उमेदवारांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या आहेत. त्यामुळे उमेदवारीसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. महायुतीचा अंतिम निर्णय जाहीर होताच उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल, असेही मंत्री महाजन यांनी सांगितले.
एकूणच, जळगाव मनपा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून सत्ता मिळवण्याचा भाजपचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला असून, उद्याच्या निर्णायक बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय लक्ष केंद्रीत झाले आहे.




