
एरंडोल तालुक्यात सोलर पंप आणि सबमर्सिबल मोटार चोरी प्रकरणी LCB ची धडक कारवाई; तीन आरोपींना अटक
एरंडोल ;– जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील उमरदे गावाजवळ ट्रकमधून सबमर्सिबल मोटार आणि सोलर पंप चोरीच्या घटनेने खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली आहे, तर एक आरोपी अद्याप फरार आहे. या यशस्वी कारवाईमुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.
एरंडोल तालुक्यातील उमरदे गावाजवळ एका ट्रकमधून सबमर्सिबल मोटार पंप आणि सोलर पंप चोरीला गेल्याची तक्रार एरंडोल पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. या गुन्ह्याची गंभीर दखल घेत जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाची विशेष जबाबदारी सोपवली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान, ही चोरी आकाश लालचंद मोरे (वय २३, रा. मुगपाठ, ता. एरंडोल) याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केल्याचे उघड झाले.
पोलिसांनी नागदुली गावाजवळील पद्मालय फाटा येथून आकाश मोरे याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्याने आपल्या साथीदारांसह ही चोरी केल्याची कबुली दिली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली: भरत बाबुराव बागुल (वय ३२, रा. केवडीपुरा, ता. एरंडोल).
पृथ्वीराज रतीलाल पाटील (वय २०, रा. वरखेडी, ता. एरंडोल).या टोळीतील चौथा आरोपी पंकज रवी बागुल अद्याप फरार असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक जितेंद्र वाल्टे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. त्यांच्या पथकात पोहेकॉ संदीप पाटील, हरीलाल पाटील, प्रवीण मांडोळे, राहुल कोळी आणि दीपक चौधरी यांचा समावेश होता. पथकाने तांत्रिक पुरावे आणि माहितीच्या आधारे संशयितांना ताब्यात घेऊन चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावला.
.