
जळगाव – शहरातील गोलाणी मार्केट परिसरात खाऊ गल्लीत एका युवकाला काहीही कारण नसताना टोळक्याने लाकडी काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. ही घटना २७ जून रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिरोज खान सरदार खान (वय ३६, रा. मुस्लिम कॉलनी, आकाशवाणी केंद्राच्या मागे) हे दैनंदिन कामासाठी गोलाणी मार्केटमधील खाऊ गल्ली परिसरात उपस्थित होते. दरम्यान, अचानक तीन ते चार अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या दुकानासमोर येत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. किरकोळ कारणावरून वाद वाढवत त्यांनी फिरोज खान यांना शिवीगाळ करत लाकडी काठीने मारहाण केली.
या हल्ल्यात फिरोज खान यांच्या हाताला व पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी अवस्थेत त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असून पोलीसांनी संबंधित टोळक्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार विरेंद्र शिंदे करीत आहेत.