
बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस – प्रकृती खालावली, राज्यभरातून पाठिंबा
अमरावती (प्रतिनिधी) – शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह अन्य १७ मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आज आंदोलनाचा चौथा दिवस असून, उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. डॉक्टरांनी औषधोपचार घेण्याचा सल्ला दिला असतानाही बच्चू कडूंनी उपचार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
बच्चू कडू यांच्या या संघर्षाला आता राज्यातील विविध पक्ष व संघटनांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय किसान युनियन, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, शेतकरी नेते मनोज जरांगे पाटील, राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांनी बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.
शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर
या आंदोलनात संपूर्ण कर्जमाफी, वीजबिल माफी, पिक विमा योजना सुलभ करणे, सिंचन प्रकल्पांना गती देणे, शेतमालाला हमीभाव आणि नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत देणे अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही ठोस प्रतिक्रिया न आल्यामुळे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
राजकीय तापमान चढले
या आंदोलनामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. बच्चू कडूंच्या प्रकृतीत होत असलेल्या घसरणीकडे लक्ष देत शासनाने लवकरात लवकर चर्चा करून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी समर्थक संघटनांकडून केली जात आहे.