
प्रभाग १३ मध्ये महायुतीचा झंझावात; प्रफुल देवकर यांच्यासह उमेदवारांना जनसामान्यांचा कौल
गाडगे बाबा चौक व मोहन नगर परिसरात जल्लोषात प्रचार फेरी; ठिकठिकाणी महिलांकडून उमेदवारांचे औक्षण
जळगाव | प्रतिनिधी जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक १३ मध्ये महायुतीच्या उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावला असून, गाडगे बाबा चौक आणि मोहन नगर परिसरात काढण्यात आलेल्या प्रचार फेरीला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रफुल देवकर यांच्यासह सर्व उमेदवारांनी दौलत नगर, रामनगर आणि गाडगे बाबा चौक भागात घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला. या दौऱ्याने संपूर्ण प्रभागात महायुतीच्या विजयाचे वातावरण निर्माण केले आहे.
प्रचार फेरीदरम्यान उमेदवारांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी महिलांनी उमेदवारांचे औक्षण करून आणि पुष्पहार अर्पण करून विजयाचा टिळा लावला, तर ज्येष्ठ नागरिकांनी उमेदवारांना उत्स्फूर्तपणे आशीर्वाद दिले. नागरिकांच्या या प्रेमामुळे आणि प्रतिसादामुळे उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला असून, प्रचाराची ही धार अधिक तीव्र झाली आहे.
या भेटीगाठी दरम्यान उमेदवारांनी नागरिकांच्या स्थानिक समस्या जाणून घेण्यावर भर दिला. रस्ते, नियमित पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधांबाबतच्या तक्रारी ऐकून घेत, आगामी काळात विकासाभिमुख कामांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असा ठाम विश्वास प्रफुल देवकर यांनी मतदारांना दिला. “प्रभागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी महायुती कटिबद्ध आहे,” अशी ग्वाही यावेळी उमेदवारांनी दिली.
या भव्य प्रचार फेरीत प्रफुल देवकर, सौ. सुरेखा नितीन तायडे यांच्यासह नितीन सपके, रोहिदास पाटील, मधुकर पाटील, दीपक भोसले, ललित देशमुख, अतुल जाधव, अमोल पाटील, रवि पाटील, धवल पाटील, तन्मय चौधरी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांच्या गगनभेदी जयघोषाने आणि ‘कमळ-घड्याळाच्या’ घोषणांनी संपूर्ण प्रभाग दणाणून गेला होता.




