
कुसुंबे गावात बंद घर फोडून १८ तोळे सोने व रोख रक्कम लंपास
ब्रिटिशकालीन २५ शिक्क्यांचाही समावेश; चोरीमुळे गावात भीतीचे वातावरण
चोपडा (प्रतिनिधी) – तालुक्यातील कुसुंबे येथे बंद घराचे कुलूप फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ७ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना ११ जूनच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली. चोरट्यांनी घरातील कपाटातून सोन्याचे १८ तोळे दागिने, रोख २० हजार रुपये व ब्रिटिशकालीन २५ जुने शिक्के असा एकूण मौल्यवान मुद्देमाल चोरून नेला.
कुसुंबे येथील तुषार शामकांत पाटील (वय ४५) यांचे घर सध्या बंद असल्याने त्याला कुलूप लावण्यात आले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यांनी कपाटाचा लॉक उचकटून सुमारे १८१ ग्रॅम वजनाचे दागिने, रोख रक्कम आणि ऐतिहासिक नाणे असा ऐवज चोरून नेला.
ही घटना सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. पाटील यांच्या शेजारी राहणाऱ्या त्यांच्या काकूंना घराचा मागचा दरवाजा उघडा दिसल्याने त्यांनी तातडीने पाटील यांना फोन करून याबाबत माहिती दिली. पाटील यांनी तातडीने गावात येत घटनेची पाहणी केली आणि नंतर चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. चोरीमुळे कुसुंबे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.