जळगावराजकारणसामाजिक

भाजप आमदार बबन लोणीकर यांच्या विधानाविरोधात शिवसेनेचा तीव्र निषेध : जळगावात पुतळा दहन

भाजप आमदार बबन लोणीकर यांच्या विधानाविरोधात शिवसेनेचा तीव्र निषेध : जळगावात पुतळा दहन

सरकारवर जोरदार हल्लाबोल

जळगाव (प्रतिनिधी) – शेतकऱ्यांबाबत अवमानकारक वक्तव्य करणारे भाजपचे आमदार बबन लोणीकर यांच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जळगावात पुतळा दहन करत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकरी विरोधी धोरणांवर सडकून टीका करण्यात आली.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारला इशारा देत सांगितले की, “शेतकऱ्यांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही”. महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफीची आश्वासने अद्याप पाळलेली नाहीत, उलट सरकारमधील काही आमदार बेताल वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत असल्याचा आरोप जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांनी केला.

आमदार लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी अद्याप मौन बाळगले आहे. हे मौन म्हणजे या वक्तव्याचे समर्थनच असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. “या सरकारला सत्तेचा गर्व झाला आहे. शेतकरी राजाला कमी लेखण्याचे प्रकार सुरू आहेत, हे शिवसेना सहन करणार नाही,” असा इशारा देत कुलभूषण पाटील यांनी आमदार लोणीकर यांनी तात्काळ माफी मागावी, अन्यथा शिवसेनेतर्फे सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि ‘अंत्ययात्रा’ काढण्यात येईल, असा इशाराही दिला.

या आंदोलनात जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे, तालुकाप्रमुख उमेश पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी, माजी शहर संघटक राजूभाऊ पाटील, महिला महानगर प्रमुख मनीषाताई पाटील, विभागप्रमुख विजय बांदल, विजय राठोड, जितेंद्र बारी, रुपेश पाटील, भैय्या वाघ, किरण ठाकूर, सचिन चौधरी, बापू मोणे, सतीश मोरे, दीपक पवार, मयूर गवळी, अंकित कासार, अनिल गवळी आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button