
जळगाव मीडिया प्रतिनिधी: भारतात लवकरच ₹100 आणि ₹200 च्या नवीन नोटा चलनात येणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या नवीन नोटांवर RBI चे सध्याचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असेल. सध्याच्या ₹100 आणि ₹200 च्या नोटा कायदेशीर राहणार असून, त्या पूर्वीप्रमाणेच वापरता येतील. त्यामुळे नागरिकांनी जुन्या नोटांबाबत चिंता करण्याची गरज नाही. नवीन ₹200 ची नोट 66 मिमी x 146 मिमी आकाराची असून, तिचा रंग चमकदार पिवळा असेल. या नोटेच्या मागील बाजूस सांची स्तूप चे चित्र असेल, जे भारताच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. तसेच, नोटेच्या समोरील आणि मागील बाजूस भौमितिक डिझाईन असतील, जे एकूण रंगसंगतीशी सुसंगत असतील.
नवीन ₹100 ची नोट 66 मिमी x 142 मिमी आकाराची असून, तिचा मुख्य रंग लैव्हेंडर (फिकट जांभळा) असेल. नोटेच्या मागील बाजूस राणी की वाव चे चित्र असेल, जे भारताच्या ऐतिहासिक वारशाचे प्रतीक आहे. या नोटेवरही आकर्षक भौमितिक डिझाईन असेल. आरबीआयच्या अधिकृत छपाईखान्यात या नव्या नोटांची छपाई सुरू झाली असून, लवकरच त्या देशभरात बँकांद्वारे आणि एटीएमद्वारे उपलब्ध होतील. तसेच, ₹50 च्या नोटेवरही आता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असेल आणि ती देखील लवकरच चलनात आणली जाईल. सध्या चलनात असलेल्या ₹100 आणि ₹200 च्या नोटा कायदेशीर राहतील आणि त्यांचा वापर सुरूच राहील. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत माहिती RBI च्या संकेतस्थळावरून मिळवावी.