
तरुण शेतकऱ्याची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
जळगाव तालुक्यातील वाकडी येथील घटना
जळगाव मीडिया न्यूज l जळगाव तालुक्यातील वाकडी गावात लग्नाच्या आनंदी वातावरणात अचानक दुःखद घटनेने शोककळा पसरली आहे. अमोल वाल्मीक पाटील (वय २१) या तरुण शेतकऱ्याने मंगळवार, १३ मे २०२५ रोजी सकाळी शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.वाकडी येथे आपल्या आई-वडील आणि दोन भावांसह राहणारा अमोल शेतीच्या कामात वडिलांना मदत करत होता.
त्याचे खामखेडा (ता. मुक्ताईनगर) येथील मुलीशी लग्न ठरले होते. २० मे रोजी हळदीचा आणि २१ मे रोजी विवाहाचा सोहळा नियोजित असल्याने पाटील कुटुंबात लग्नाची लगबग सुरू होती. घरी सजावट, पाहुण्यांची ये-जा यामुळे आनंदाचे वातावरण होते.मात्र, सोमवारी, १२ मे रोजी रात्री जेवणानंतर अमोल शेतात गेला आणि घरी परतलाच नाही. मंगळवारी सकाळी गावकऱ्यांना तो शेतालगतच्या झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला.
त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.या घटनेने पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. लग्नाच्या आनंदी वातावरणात कुटुंबीयांचा आक्रोश आणि अश्रू यांनी गावकऱ्यांचे मन हेलावले. वाकडी गावात शोककळा पसरली असून, अमोलने टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.