
मनपाच्या मैदानात शिवसेनेचा चौकार !
प्रभाग क्रमांक १९ ‘अ’ मधून रेखा चुडामण पाटील बिनविरोध
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) यांना आणखी एक यश मिळाले असून प्रभाग क्रमांक १९ ‘अ’ मधून रेखा चुडामण पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. यामुळे महापालिकेत शिवसेना शिंदे गटाच्या बिनविरोध जागांचा आकडा चारवर पोहोचला असून महायुतीचा एकूण बिनविरोध उमेदवारांचा आकडा पाच झाला आहे.
जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी मोठ्या संख्येने उमेदवार रिंगणात उतरले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची २ जानेवारी ही अंतिम मुदत असून, प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी राजकीय पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. माघारीच्या पहिल्याच दिवशी काही ठिकाणी आमने-सामने असलेल्या लढतीतील उमेदवारांनी माघार घेतल्याने शिवसेनेच्या तीन उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली होती.
यामध्ये प्रभाग क्रमांक १८ ‘अ’ मधून शिवसेनेचे उमेदवार तसेच आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे सुपुत्र डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर प्रभाग क्रमांक ९ ‘अ’ मधून मनोज चौधरी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. तसेच प्रभाग क्रमांक ९ ‘ब’ मधून अपक्ष उमेदवार प्रतिभा पाटील यांनी माघार घेतल्याने प्रतिभा देशमुख यांची निवड बिनविरोध ठरली.
माघारीच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेची चौथी जागा बिनविरोध झाली असून प्रभाग क्रमांक १९ ‘अ’ मधून रेखा चुडामण पाटील यांची बिनविरोध निवड अधिकृतपणे निश्चित झाली आहे. त्यामुळे जळगाव महापालिकेत शिवसेना (शिंदे गट) चार जागांवर, तर महायुती पाच जागांवर बिनविरोध आघाडीवर आहे.
यापूर्वी प्रभाग क्रमांक १२ ‘ब’ मधून भाजपच्या माजी महानगराध्यक्षा उज्ज्वला मोहन बेंडाळे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली होती. महापालिका निवडणुकीत सुरू झालेल्या या बिनविरोध निवडींमुळे राजकीय समीकरणांना वेगळी दिशा मिळताना दिसत आहे.




