एअर इंडियाचं विमान अहमदाबादमध्ये कोसळलं; २४२ प्रवासी असल्याची माहिती, मोठ्या हानीची भीती

एअर इंडियाचं विमान अहमदाबादमध्ये कोसळलं; २४२ प्रवासी असल्याची माहिती, मोठ्या हानीची भीती
अहमदाबाद (प्रतिनिधी) – गुजरातमधून अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. अहमदाबाद शहरातील मेघानीनगर परिसरात एअर इंडियाच्या AI-171 या प्रवासी विमानाचा अपघात झाला आहे. बोइंग 787-8 ड्रीमलाइनर प्रकारचं हे विमान, अहमदाबादहून लंडनच्या दिशेने उड्डाण करत असताना अवघ्या सात किलोमीटर अंतरावर कोसळल्याची घटना आज सकाळी घडली.
धुराचे लोट आणि थरकाप उडवणारा स्फोट
घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट उठताना दिसत आहेत. विमान कोसळल्यानंतर जोरदार स्फोट झाला आणि त्यानंतर विमानाने पेट घेतला. व्हिडीओ फुटेजनुसार, विमानाचे पंख तुटून बाजूला पडले असून आगीचे भयाण दृश्य दिसत आहे. ही दुर्घटना रहिवासी भागात घडल्याने मोठ्या जीवितहानीची शक्यता वर्तवली जात आहे.
विमानात २४२ प्रवासी आणि १४ कर्मचारी
या विमानात २४२ प्रवासी आणि दोन पायलटसह १२ क्रू सदस्य असल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे. विमानाने सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच (सुमारे ७ किमी अंतरावर) नियंत्रण गमावून अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
बचावकार्य सुरू, एनडीआरएफ घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच अहमदाबाद पोलीस, अग्निशमन दलाच्या सात गाड्या, आपत्कालीन बचाव पथक तसेच एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. परिसरातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
एअर इंडियाची अधिकृत पुष्टी, अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट
एअर इंडियाने या अपघाताची अधिकृत पुष्टी केली असून सध्या अपघातामागचं कारण स्पष्ट झालेलं नाही. मात्र, तांत्रिक बिघाडाची शक्यता वर्तवली जात आहे. अपघातग्रस्त भागात आग विझवण्याचं आणि अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.