
भारताचा खास मित्र देश कतार बनलं सर्वात श्रीमंत मुस्लिम राष्ट्र
पाकिस्तान या संपन्न देशांच्या यादीपासून दूर….!
| मुंबई जगभरात इस्लाम धर्माचे अनुयायी वाढत असताना, मुस्लिम राष्ट्रांमध्येही आर्थिक प्रगतीचे चित्र मोठ्या प्रमाणावर बदलले आहे. काही देश अजूनही दारिद्र्याशी झुंज देत असले तरी, काही मुस्लिम राष्ट्रांनी प्रचंड नैसर्गिक संपत्तीच्या जोरावर जागतिक अर्थव्यवस्थेत आपले भक्कम स्थान निर्माण केले आहे. विशेष म्हणजे, भारताचा विश्वासू मित्र असलेल्या कतारने या यादीत अव्वल क्रमांक पटकावला आहे.
कतार – संपत्तीचा शिखर
फक्त 1.7 दशलक्ष लोकसंख्या असलेला कतार हा सध्या जगातील सर्वात श्रीमंत मुस्लिम देश आहे. नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलाच्या निर्यातीवर आधारित अर्थव्यवस्थेमुळे कतारने अफाट संपत्ती कमावली आहे. 2011 मध्ये कतारचे दरडोई उत्पन्न 88,919 अमेरिकी डॉलर इतके होते, जे अनेक प्रगत देशांपेक्षाही जास्त होते.
कुवेत – आखाती संपत्तीचा केंद्रबिंदू
दुसऱ्या क्रमांकावर आहे कुवेत, ज्याची लोकसंख्या अंदाजे 3.5 दशलक्ष आहे. तेलसंपत्तीवर आधारित अर्थव्यवस्था, शिपिंग उद्योग आणि भौगोलिक स्थानामुळे कुवेतची घोडदौड सुरू आहे. 2011 मध्ये कुवेतचे दरडोई उत्पन्न 54,664 डॉलर इतके होते.
ब्रुनेई – छोटं पण श्रीमंत राष्ट्र
तिसऱ्या स्थानावर ब्रुनेई आहे. 2010 मध्ये त्याचे दरडोई उत्पन्न 50,506 डॉलर होते. गेल्या अनेक दशकांपासून तेल आणि नैसर्गिक वायूच्या आधारे ब्रुनेईने आपली अर्थव्यवस्था मजबूत ठेवली आहे. तो जगातील नववा सर्वात मोठा वायू निर्यातदार आणि चौथा सर्वात मोठा तेल निर्यातदार देश आहे.
UAE आणि ओमान यांचीही घोडदौड
या यादीत संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि ओमान यांचाही समावेश आहे. युएईने पर्यटन, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि गुंतवणुकीच्या जोरावर आपली अर्थव्यवस्था विस्तृत केली आहे. ओमानमध्ये 849.5 अब्ज घनमीटर वायू साठे असून मौल्यवान खनिज स्रोतही त्याला संपन्न बनवतात.
सौदी अरेबिया आणि बहरीन
सौदी अरेबिया, जो जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तेल उत्पादक देश आहे, सहाव्या स्थानावर आहे. त्याच्याच मागे बहरीन सातव्या क्रमांकावर असून, त्याची अर्थव्यवस्था सुद्धा पेट्रोलियमवरच आधारित आहे.
पाकिस्तानचा पत्ता नाही
या यादीतील विशेष बाब म्हणजे पाकिस्तानचे नाव कुठेही नसणे. एकेकाळी इस्लामी जगतात विशेष स्थान असलेल्या या देशाला सध्या गंभीर आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. परकीय कर्जाचा भार, आर्थिक अस्थिरता आणि संसाधनांचे दुर्लक्षित व्यवस्थापन यामुळे पाकिस्तान या संपन्न देशांच्या यादीपासून दूर राहिला आहे.