
रामानंद नगर पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा आणि जीवंत काडतूस जप्त
जळगाव :पिंप्राळा परिसरात पिस्तुलचा धाक दाखवत दहशत माजविणाऱ्या महेंद्र उर्फ दादू सपकाळे याला रामानंद नगर पोलिसांनी जेरबंद केले. पोलिसांनी त्याच्याकडून गावठी कट्टा आणि एक जीवंत काडतूस जप्त केले असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना माहिती मिळाली होती की महेंद्र सपकाळे हा गावठी कट्टा घेऊन परिसरात दहशत पसरवत आहे. त्यानुसार गुन्हे शोध पथकातील पोउनि सचिन रणशेवरे, जितेंद्र राजपूत, सुधाकर अंभोरे, जितेंद्र राठोड, हेमंत कळसकर, रेवानंद साळुंखे व गोविंदा पाटील यांनी कारवाई करून त्याला पकडले.
महेंद्र सपकाळे याच्याविरुद्ध यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलिसांच्या या कारवाईनंतर परिसरात सुटकेचा निश्वास टाकला जात आहे.