
सावदा ग्रामीण रुग्णालयात तात्काळ कर्मचारी भरतीची मागणी
सारिका चव्हाण यांचे निवेदन
सावदा (प्रतिनिधी) – सावदा येथील ग्रामीण रुग्णालयात तात्काळ आवश्यक कर्मचारी भरती करण्यात यावी, अशी मागणी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाच्या जिल्हा समन्वयक सारिका भारत चव्हाण यांनी उपविभागीय अधिकारी विजयकुमार ढगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सावदा शहरात शासनाच्या माध्यमातून एक सुसज्ज ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालयाचा लाभ सावद्यासह सुमारे ३८ गावांतील नागरिकांना होत असून, विशेषतः गोरगरीब व मजूर वर्गावर याचा मोठा प्रभाव आहे. रुग्णसंख्या मोठी असली तरी रुग्णालयात आवश्यकतेनुसार कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना वेळेवर सेवा मिळण्यात अडथळा निर्माण होत आहे.
निवेदनात २४ तारखेला सावद्यात सापडलेल्या अर्भकाचा उल्लेख करत, सर्व सोनोग्राफी सेंटर व गर्भपात केंद्रांची सखोल तपासणी करून अनियमितता आढळणाऱ्या केंद्रांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे अशा घटनांना आळा बसेल तसेच मुलींच्या जन्मदरात वाढ होईल, असेही नमूद करण्यात आले आहे.
तसेच, जिल्ह्यात वेळोवेळी मृत व जिवंत अर्भक आढळल्याच्या घटना समोर येत असल्याने, संपूर्ण जिल्ह्यातील सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांची तपासणी करून नियमभंग करणाऱ्या केंद्रांची मान्यता रद्द करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात केली आहे. यासोबतच सावदा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन कक्ष तात्काळ सुरू करण्याची गरजही अधोरेखित करण्यात आली आहे.