
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या
चाळीसगाव प्रतिनिधी l तालुक्यातील हातगाव भिल्ल वस्ती येथे सोमवारी (2 जून) सकाळी 9:30 ते 11:45 वाजेच्या दरम्यान एक धक्कादायक घटना घडली. विजय सुकदेव चव्हाणके (वय 45, रा. सावरगाव) याने चारित्र्याच्या संशयावरून पत्नी वर्षा विजय चव्हाण यांचा दोरीने गळा आवळून खून केला आणि स्वतः शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मृत विजयच्या मोठ्या भावाने, अशोक सुकदेव चव्हाणके यांनी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
विजय चव्हाणके हा पत्नी वर्षा, मुले आणि आई यांच्यासह हातगाव शिवारात राहत होता. दोन वर्षांपूर्वी झालेल्या अपघातामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते, ज्यामुळे त्याचे आणि पत्नी वर्षा यांच्यात कौटुंबिक कारणांवरून सतत वाद होत असत. विजय पत्नीवर चारित्र्याचा संशय घ्यायचा. सोमवारी सकाळी 11:25 वाजेच्या सुमारास विजयने आपल्या मोठ्या भावाला अशोक यांना फोन करून सांगितले की, त्याने वर्षाचा खून केला असून तो स्वतःही बरेवाईट पाऊल उचलणार आहे.घटनास्थळाचा आढावा: ही माहिती मिळताच अशोक यांनी कुटुंबासह शेतात धाव घेतली. तिथे त्यांना विजय आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला, तर वर्षा शेतातील गुरांच्या चाऱ्याजवळ जमिनीवर मृतावस्थेत आढळली. तिच्या गळ्याभोवती सुती दोरी गुंडाळलेली होती. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
अशोक चव्हाणके यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विजयविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे हातगाव आणि सावरगाव परिसरात शोककळा पसरली आहे.