जळगावसामाजिक

राज्यात पावसासह उष्णतेचा दणका; अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

राज्यात पावसासह उष्णतेचा दणका; अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव; २५ एप्रिलपर्यंत वादळी पावसाची शक्यता

मुंबई | प्रतिनिधी राज्यात सध्या पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे हवामानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत असून काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि गारपीट होत आहे, तर काही ठिकाणी उष्णतेची लाटेसदृश्य स्थिती कायम आहे. यामुळे कमाल तापमानात लक्षणीय वाढ नोंदवली जात आहे.

हवामान विभागाने पुढील तीन दिवस राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवली असून संबंधित जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ तसेच कोकणातील काही भागात २५ एप्रिलपर्यंत वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, काही ठिकाणी उष्ण व दमट वातावरणही जाणवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यात मार्चच्या अखेरीस व एप्रिलच्या सुरुवातीला पावसाची नोंद झाल्यानंतर पुन्हा उष्णतेत वाढ झाली होती. मात्र, सध्या पुन्हा पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाल्याने हवामानात अस्थिरता निर्माण झाली आहे. २५ एप्रिलनंतर या विक्षोभाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

देशातही हवामान अस्थिर असून काही ठिकाणी तापमानात वाढ होत आहे. हवामान अभ्यासकांच्या मते, २५ ते २७ एप्रिल दरम्यान उत्तर भारतात नवीन पश्चिमी विक्षोभ सक्रिय होण्याची शक्यता आहे.

आज ‘यलो अलर्ट’ असलेले जिल्हे
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर (घाट विभागासह), सांगली, सातारा (घाट विभागासह), पुणे (घाट विभागासह), अहिल्यानगर, नाशिक (घाट विभागासह), छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धाराशिव, सोलापूर, लातूर, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना बुधवारी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. या भागांत ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button