गुन्हेजळगाव

चाळीसगावात ६.५७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, पाच जण जेरबंद !

चाळीसगावात ६.५७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, पाच जण जेरबंद !

अन्न सुरक्षा विभाग व पोलिसांची संयुक्त धडक कारवाई

चाळीसगाव | प्रतिनिधी

चाळीसगाव शहरात अन्न सुरक्षा विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखूची वाहतूक आणि साठा उघडकीस आणला. या कारवाईत ६ लाख ५७ हजार ८७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी शरद मधुकर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ९ जुलै २०२६ रोजी मध्यरात्री हनुमानवाडी, आनंदवाडी आणि बसस्थानक परिसरात एकाचवेळी छापेमारी करण्यात आली.

कारवाईदरम्यान विमल पान मसाला, डायरेक्टर स्पेशल पान मसाला, पान पराग, आरएमडी, रजनीगंधा, राजश्री, राजनिवास, मिराज, केर कोकिल, तुळशी-००, रॉयल जाफरानी जर्दा, एम सुगंधी तंबाखू, बाबा, शॉट, केपी डबल ब्लॅक, झेडएन-०१ जाफरानी जर्दा यासह विविध प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा आणि एमएच-१८ डब्ल्यू-८९७७ क्रमांकाची टाटा इंडिका कार जप्त करण्यात आली.

या प्रकरणी अजित चांदुमल रावलानी (वय ४३), कुबेर शेखर कदम (वय २७), हितेश किशोर पवार (वय २१), निखिल राजेंद्र केसरवाणी (वय ३१) आणि सौरभ संजय शिनकर (वय २७) यांना अटक करण्यात आली आहे.

सार्वजनिक आरोग्यास अपायकारक असलेल्या प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक व विक्री केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईचे मार्गदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड आणि पोलीस निरीक्षक अमितकुमार मने यांनी केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले करीत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button