
सोन्याच्या बिस्किटांच्या तस्करीचा संशय; दोघे ताब्यात
ममुराबाद रस्त्यावर मध्यरात्री कारवाई; १०.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त
जळगाव, प्रतिनिधी : सोन्याच्या बिस्किटांच्या तस्करीसाठी संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोन तरुणांना शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून साडेसात लाख रुपयांची रोकड आणि बुलेट मोटारसायकल असा एकूण १० लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. १६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास ममुराबाद रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांना आवश्यक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त तैनात करून नाकाबंदी करण्यात येत होती. या मोहिमेदरम्यान सोन्याच्या बिस्किटांच्या तस्करीसाठी काही व्यक्ती शहरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांनी इम्रान रहिम बेग आणि मंगल साळुंखे यांना ममुराबाद रस्त्यावर रवाना केले. तेथे एमएच १९, ईयू १८८४ क्रमांकाच्या बुलेटवरून दोन तरुण संशयास्पदरीत्या फिरताना आढळले. पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली.
बॅगेत सापडली साडेसात लाखांची रोकड
हरिष राजेंद्र महाजन (वय ३०) आणि सुजित गोकुळ महाजन (वय २६, दोघे रा. अडावद, ता. चोपडा) अशी ताब्यात घेतलेल्या तरुणांची नावे आहेत. त्यांच्या बॅगेची झडती घेतली असता साडेसात लाख रुपयांची रोकड आढळून आली. पोलिसांनी रोकड आणि बुलेट मोटारसायकल असा एकूण १० लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सोन्याच्या बिस्किटांच्या तस्करीसाठी संशयास्पद हालचाली होत असल्याच्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली.




