
धामणगावात बिबट्याचा धुमाकूळ; चार शेळ्या ठार
कळमडू रस्त्यालगतच्या शेतात घटना; शेतकऱ्यांत भीती
चाळीसगाव, प्रतिनिधी : तालुक्यातील धामणगाव येथे बिबट्याने शेतातील बंदिस्त जाळी तोडून एका शेळीसह तीन पिल्लांचा फडशा पाडल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जाळी तोडून शेळ्यांवर हल्ला
धामणगाव येथील भिकन बाबुलाल चव्हाण यांची कळमडू रस्त्यालगत शेती असून, ते शेळीपालन करतात. सोमवारी सायंकाळी त्यांनी आपल्या शेळ्या शेतातील बंदिस्त जाळीत बांधल्या आणि घरी गेले. मात्र, मंगळवारी सकाळी शेतात गेल्यानंतर त्यांना चार शेळ्या मृतावस्थेत आढळल्या. बिबट्याने बंदिस्त जाळी तोडून शेळ्यांवर हल्ला केल्याचे समोर आले.
वन विभागाकडून बंदोबस्ताची मागणी
घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली आहे. परिसरात बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी आणि पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.



