
भुसावळ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! मध्य प्रदेशातील सराईत दुचाकी चोरटा गजाआड; ६ गुन्हे उघड, लाखोंचा मुद्देमाल जप्त
भुसावळ (विशेष प्रतिनिधी) :
भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने (DB) दुचाकी चोरीच्या सत्राचा छडा लावत एका आंतरराज्यीय सराईत चोरट्याला जेरबंद केले आहे. अटक करण्यात आलेला आरोपी थेट मध्य प्रदेशातील असून, त्याच्याकडून भुसावळ, जामनेर आणि अमळनेर परिसरातून चोरलेल्या तब्बल ६ मोटारसायकली जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे दुचाकी चोरांच्या टोळीला मोठा हादरा बसला आहे.
पार्किंगमधून झाली होती दुचाकी लंपास
२३ जानेवारी २०२६ रोजी भुसावळ शहरातील झेडटीएस रोडवरील एमओएच पार्किंग शेडमधून विजय जगन्नाथ खडके (रा. मोहित नगर, भुसावळ) यांची हिरो मोटोकॉर्प कंपनीची दुचाकी (क्र. MH-19 EK-2350) अज्ञात चोरट्याने पळवून नेली होती. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चोरट्याचा माग काढण्यास सुरुवात केली होती.
सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या जाळ्यात अडकला चोरटा!
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिलेल्या कडक सूचनांनुसार, गुन्हे शोध पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांचे जाळे सक्रिय केले. तपासादरम्यान संशयित आरोपी चोपडा बसस्थानक परिसरात फिरत असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून विशाल राजेंद्र राठोर (वय ४६, रा. भिकनगाव, जि. खरगोन, मध्य प्रदेश) याला बेड्या ठोकल्या.
तपासात मोठे यश; तीन तालुक्यांतील ६ गुन्हे उघड
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी विशाल राठोर याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या ६ दुचाकींमुळे जळगाव जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमधील गुन्ह्यांची उकल झाली आहे:
भुसावळ शहर पोलीस ठाणे – दुचाकी चोरीचे गुन्हे
जामनेर पोलीस ठाणे – दुचाकी चोरीचे गुन्हे
अमळनेर पोलीस ठाणे – दुचाकी चोरीचे गुन्हे
टीम वर्कला यश: ही धडाकेबाज कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, डीवायएसपी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ शहरचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, पोलीस नाईक अब्दुल रज्जाक खान, पोलीस कॉन्स्टेबल सुबोध मोरे, राहुल बेहेनवाल, कुणाल सोनवणे आणि दीपक पाटील यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.




