सावधान इंडिया ! सतर्क राहूनच मुलांची औषधं खरेदी करा, कोल्डरीफनंतर आणखी 2 सिरपमध्ये भेसळ

जळगाव मीडिया प्रतिनिधी : औषधांमध्ये भेसळ आणि विषारी घटकांच्या वापरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोल्डरीफ या खोकल्याच्या औषधानंतर आता मध्य प्रदेशात रेस्पी फ्रेश टीआर (Respi Fresh TR) आणि रिलीफ (Relief) या आणखी दोन औषधांमध्ये डायथिलीन ग्लायकोल (Diethylene Glycol) हा विषारी घटक आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.
मध्य प्रदेश सरकारने केलेल्या चौकशीतून ही धक्कादायक बाब उघड झाली असून, दोन्ही औषधे गुजरात राज्यातील कंपन्यांनी तयार केली आहेत. डायथिलीन ग्लायकोल हा घटक वाहन दुरुस्तीमध्ये ब्रेक ऑइल म्हणून वापरला जातो, तसेच तो इंजिन थंड ठेवण्यासही मदत करतो. औषधे थंड राहावीत या उद्देशाने लहान मुलांच्या औषधांमध्ये या विषारी घटकाचा वापर झाल्याने आतापर्यंत १६ हून अधिक मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
या गंभीर परिस्थितीत पुण्यातही अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या पथकाने मोठी कारवाई करत बनावट कफ सिरपचा साठा जप्त केला आहे.