जळगावात मुदतबाह्य दूध व दुग्धजन्य पदार्थांचा साठा नष्ट; अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई
जळगाव प्रतिनिधी I अन्न व औषध प्रशासनाने जळगाव जिल्ह्यात आज (15 जानेवारी) विशेष मोहिम राबवत विविध आस्थापनांची तपासणी केली. यामध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थांचे एकूण 14 नमुने विश्लेषणासाठी घेतले गेले.
तपासणीत विसनजी नगर येथील रविराज एजन्सी या ठिकाणी सुमारे 4,095 रुपये किमतीचा मुदतबाह्य दूध व दुग्धजन्य पदार्थांचा साठा सापडला. जनहित व आरोग्याच्या दृष्टीने हा साठा विक्रेत्यांच्या उपस्थितीत तातडीने नष्ट करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील 100 दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत ही मोहिम राबविण्यात आली. यामध्ये अन्न व्यवसाय परवाना, भेसळ तपासणी, नमुना चाचण्या, आणि जनजागृती मोहिमांवर भर दिला जात आहे.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा आयुक्त राजेशजी नार्वेकर, सहायक आयुक्त म.ना. चौधरी, जळगाव जिल्ह्याचे सहायक आयुक्त (अन्न) सं.कृ. कांबळे आणि अन्न सुरक्षा अधिकारी कि.आ. साळुंके व श.म. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अशी माहिती जळगाव जिल्ह्याचे सहायक आयुक्त (अन्न) सं.कृ. कांबळे यांनी दिली.