जळगावात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

जळगावात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
आर्थिकदृष्ट्या गरजूंना वैद्यकीय मदतीसाठी जिल्हास्तरावरच मार्गदर्शन; अर्ज प्रक्रिया सुलभ
जळगाव | प्रतिनिधी
आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी त्वरित आर्थिक सहाय्य मिळावे, यासाठी जळगावात जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची स्थापना करण्यात आली. या कक्षाचे उद्घाटन महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाले.
उद्घाटन सोहळ्याला जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, कक्षाचे जिल्हा प्रमुख डॉ. सिद्धार्थ चौधरी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्य शासनाने २२ फेब्रुवारी २०२५ रोजी या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निर्णय घेतला होता. त्यानंतर २३ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत जिल्हास्तरीय कक्ष तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
यापूर्वी रुग्णांना सहाय्यता निधीसाठी मंत्रालयात खेटे घालावे लागत होते. आता जिल्हास्तरावर कक्ष सुरू झाल्याने अर्ज प्रक्रिया सुलभ झाली आहे. रुग्णांना स्थानिक पातळीवरच मार्गदर्शन, कागदपत्र पडताळणी आणि पाठपुरावा मिळणार आहे. यामुळे गरजू रुग्णांना त्वरित मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.