
भुसावळ रेल्वे स्थानकावर घरातून पळून आलेली अल्पवयीन मुलगी सापडली
भुसावळ (प्रतिनिधी) – घरातून कोणालाही न सांगता निघून गेलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला भुसावळ रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने ‘नन्हे फरिश्ते’ मोहिमेअंतर्गत ताब्यात घेतले. तिला जळगाव येथील बाल कल्याण समितीकडे सोपवण्यात आले असून, तिच्या पालकांचा शोध सुरू आहे.
रविवार, ९ जून रोजी दुपारी १२ वाजता अप क्र. १२५३३ पुष्पक एक्स्प्रेसच्या एस-४ डब्यात तिकीट निरीक्षक के. के. मालपाणी ड्युटीवर होते. दरम्यान, त्यांनी एका संशयास्पद अल्पवयीन मुलीला पाहिले. चौकशीअंती तिच्याकडे कोणतेही तिकीट अथवा ओळखपत्र नव्हते व तिची उत्तरेही संभ्रमित करणारी होती. त्यामुळे भुसावळ स्थानकावर पोहोचताच त्यांनी संबंधित मुलीला तात्काळ आरपीएफच्या ताब्यात दिले.
रेल्वे पोलीस ठाण्यात आणल्यानंतर निरीक्षक आर. पी. मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली महिला हवालदार एस. एम. वादे आणि एएसआय एस. जे. दुबे यांच्या उपस्थितीत तिची सखोल चौकशी करण्यात आली. यावेळी तिने स्वतःचे नाव, वय सांगत ती उत्तर प्रदेशातील अलाहाबाद जिल्ह्यातील महुईया गावची असल्याचे नमूद केले. तसेच, घरच्यांना न सांगता नातेवाईकांकडे जाण्यासाठी प्रवास करत असल्याचे सांगितले.
तिच्याकडून कोणताही संपर्क क्रमांक न मिळाल्यामुळे पुढील काळजी म्हणून तिला जळगाव येथील महिला सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. या घटनेमुळे ‘नन्हे फरिश्ते’ मोहिमेची उपयुक्तता अधोरेखित झाली असून, मुलीच्या पालकांचा शोध सुरू असल्याची माहिती आरपीएफतर्फे देण्यात आली आहे.