कामात व्यस्त असल्याचे सांगून मनपा आयुक्तांचा भेटीला नकार ; समाजवादी पार्टीने मुख्य प्रवेशद्वाराला निवेदन चिटकवून व्यक्त केला निषेध !

कामात व्यस्त असल्याचे सांगून मनपा आयुक्तांचा भेटीला नकार ; समाजवादी पार्टीने मुख्य प्रवेशद्वाराला निवेदन चिटकवून व्यक्त केला निषेध !
जळगाव (प्रतिनिधी) – शहरात वादळी पावसामुळे पडलेले वृक्ष, अडलेले रस्ते आणि साचलेले पाणी यामुळे निर्माण झालेल्या त्रासाबाबत तत्काळ उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी समाजवादी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन देण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, आयुक्तांनी “कामात व्यस्त” असल्याचे सांगत भेट नाकारल्यामुळे कार्यकर्त्यांनी मुख्य प्रवेशद्वारावरच निवेदन चिकटवून अभिनव पद्धतीने आपला निषेध नोंदवला.
शहरात अलीकडेच झालेल्या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळून रस्त्यांवर अडथळे निर्माण झाले आहेत. तसेच अनेक भागांत पाणी साचल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे. या संदर्भात महापालिकेने तत्काळ उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने समाजवादी पार्टीने आवाज उठवला.
याप्रसंगी रईस बागवान (प्रदेश सचिव, समाजवादी पार्टी – महाराष्ट्र), रिजवान जहागीरदार (महानगर अध्यक्ष), रईस कुरैशी (अल्पसंख्यक प्रदेश सचिव), फहीम पटेल (महानगर महासचिव), दानिश शेख (महानगर उपाध्यक्ष),
लुकमान लोखंडवाला (अल्पसंख्यक महानगर अध्यक्ष), रईस सलीम बागवान (महानगर उपाध्यक्ष), इमरान साहिल (महानगर उपाध्यक्ष), असलम खान (मीडिया सेल जिल्हा प्रमुख), तौसीफ खान (अल्पसंख्यक सचिव), इद्रीस मनियार (महानगर उपाध्यक्ष), अल्फेज मनियार. उपस्थित होते.
महापालिका प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे “शहराला वाली आहे की नाही?” असा सवाल जनतेतून उपस्थित होतो आहे. समाजवादी पार्टीच्या या अभिनव आंदोलनामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, लवकरात लवकर ठोस कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.