
सावकारांनी व्याजदराचा फलक लावणं अनिवार्य – जिल्हा प्रशासनाचा आदेश
जळगाव – जिल्ह्यातील सर्व सावकारांनी आपल्या व्यावसायिक कार्यालयाच्या दर्शनी भागात व्याजदरासंबंधी स्पष्ट फलक लावणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत संबंधितांना सूचना पाठवून तातडीने अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.
सावकारी व्यवसायात पारदर्शकता आणण्यासाठी आणि नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. फलकावर कोणत्या टक्क्याने व्याज आकारले जाते, तसेच जमीन, तारण इत्यादी अटी-सुचना स्पष्टपणे नमूद करणे बंधनकारक राहील.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, फलक न लावणाऱ्या सावकारांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. या निर्णयामुळे नागरिकांना सावकारी अटी समजण्यास सोपे जाईल आणि अतिरेकी व्याजदराच्या समस्येवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.