
पाचोरा येथे मातीचे घर कोसळल्याने ढिगाऱ्याखाली १२ वर्षीय मुलाचा दबून मृत्यू, एक जखमी
पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील सततच्या अतिवृष्टीमुळे शहरातील कृष्णापुरी परिसरातील टेकडीगल्लीत मातीचे घर कोसळून एक १२ वर्षीय मुलगा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यूमुखी पडला, तर दुसरा मुलगा जखमी झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मृत मुलाचे नाव महेश नितिन राणे (वय १२, रा. लोंढे, ता. चाळीसगाव) असे आहे. तो आपल्या विधवा आईचा एकुलता एक मुलगा होता आणि शिक्षणासाठी पाचोर्यातील नातेवाईकांकडे राहत होता. २९ सप्टेंबर रोजी दुपारी महेश आणि त्याचा मावसभाऊ योगेश पाटील घराच्या मागील भागात झोपले असताना अचानक मातीचा भाग कोसळला. स्थानिकांच्या मदतीने ढिगारा हटवून दोघांना बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महेशला मृत घोषित केले, तर योगेशवर उपचार सुरू आहेत.
गेल्या वीस दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घराची भिंत आणि पाया ओलसर झाल्याने ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेनंतर नगरपालिका मुख्याधिकारी मंगेश देवरे, तहसीलदार विजय बनसोडे, पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळाला भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. या घटनेमुळे विधवा आईचा एकमेव आधार हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.