
दवाखान्यात नेतो म्हणत अल्पवयीन मेहुणीला पळवले; जावयाविरुद्ध फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा
जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका गावात गर्भवती पत्नीला भेटण्यासाठी आलेल्या जावयाने आपल्या अल्पवयीन मेहुणीला दवाखान्यात नेण्याच्या बहाण्याने फसवून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने फत्तेपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.
फिर्यादी महिलेच्या मोठ्या मुलीचा पती काही दिवसांपूर्वी पत्नीची विचारपूस करण्यासाठी सासरी आला होता. या दरम्यान त्याने घरातील अल्पवयीन मेहुणीला तब्येतीच्या कारणास्तव दवाखान्यात नेण्याची परवानगी मागितली. कुटुंबीयांनी विश्वासाने तिला त्याच्यासोबत पाठवले. मात्र, सायंकाळपर्यंत दोघेही घरी परतले नाहीत.
कुटुंबीयांनी परिसरात शोध घेतला, परंतु त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर मुलीच्या आईने संशयित जावयाविरुद्ध अल्पवयीन मुलीला फसवून पळवून नेल्याची तक्रार नोंदवली.
फत्तेपूर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून संशयिताचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली आहेत. पुढील तपास सुरू आहे.