गुन्हेजळगाव

बाप की वैरी! झोपेत असलेल्या दोन चिमुकल्यांवर कुऱ्हाडीने सपासप वार; १३ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू, मुलगा गंभीर

बाप की वैरी! झोपेत असलेल्या दोन चिमुकल्यांवर कुऱ्हाडीने सपासप वार; १३ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू, मुलगा गंभीर

चोपडा तालुक्यातील वडती येथील संतापजनक घटना; अडावद पोलिसांनी आरोपीला जंगलातून घेतले ताब्यात

चोपडा (प्रतिनिधी) : जन्मदात्या बापानेच आपल्या दोन अल्पवयीन मुलांवर गाढ झोपेत असताना कुऱ्हाडीने सपासप वार केल्याची अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक घटना रविवारी पहाटे चोपडा तालुक्यातील वडती येथे उघडकीस आली. या अमानुष हल्ल्यात १३ वर्षीय चिमुकलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर ११ वर्षीय मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडून गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर जंगलात पळून गेलेल्या नराधम बापाला अडावद पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे.

मीरा सुभाष भिलाला (वय १३) असे मृत मुलीचे नाव असून, रामू सुभाष भिलाला (वय ११) असे गंभीर जखमी मुलाचे नाव आहे. रामूवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात तीव्र संताप व हळहळ व्यक्त होत आहे.
झोपेतच केला नरसंहार

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी सुभाष गोपाळ भिलाला (वय ५०, रा. वडती) याला तीन मुले व तीन मुली आहेत. यातील दोन मुले व मुलींचे विवाह झाले आहेत. सुभाषची पत्नी दूध फेडरेशन परिसरात राहत असून, तो घर दुरुस्तीच्या कामासाठी मीरा आणि रामू या दोन मुलांना घेऊन वडती येथील मूळ घरी आला होता.

रविवारी पहाटेच्या सुमारास दोन्ही मुले घरात गाढ झोपेत असताना, आरोपी सुभाष याने हातात कुऱ्हाड घेऊन त्यांच्या मान व शरीरावर अमानुषपणे सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात मीरा हिचा घटनास्थळीच तडफडून मृत्यू झाला, तर रामू गंभीर जखमी झाला.
नाकेबंदी करून आरोपीला जंगलात आवळले

हल्ल्यानंतर रक्ताने माखलेला आरोपी सुभाष भिलाला घटनास्थळावरून पसार झाला आणि जवळच्या जंगलाच्या दिशेने निघून गेला. घटनेची माहिती मिळताच अडावद पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरात कसून शोधमोहीम राबवत जंगल परिसरातून आरोपी बापाला शिताफीने ताब्यात घेतले.

व्यसन आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी?
प्राथमिक माहितीनुसार आरोपी सुभाष याला दारूचे तीव्र व्यसन आहे. कौटुंबिक वाद, मानसिक अस्थिरता की अन्य काही कारणातून हे कृत्य घडले, याचा पोलीस शोध घेत आहेत. विशेष म्हणजे, आरोपीविरुद्ध यापूर्वीही कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) अन्वये गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

घटनेनंतर अडावद पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) खुनाचा व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, अडावद पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button