
कौटुंबिक वादातून तरुणाची हत्या; मेहुण्याला अटक
छत्रपती शिवाजीनगर परिसरातील घटना; धारदार शस्त्राने हल्ला, आजीही जखमी
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज परिसरात कौटुंबिक वादातून झालेल्या प्राणघातक हल्ल्यात सनी विनोद डोळे (वय २७, रा. शिवाजीनगर, जळगाव) या तरुणाचा मृत्यू झाला. सोमवारी (२६ ऑक्टोबर) दुपारी सुमारे एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी सनीचा मेहुणा सुरज नारायण वानखेडे (रा. कंडारी, ता. भुसावळ) याला पोलिसांनी अटक केली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सनी डोळे आणि त्याचा मेहुणा सुरज वानखेडे यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद झाला. या वादाने काही वेळातच गंभीर वळण घेतले. यावेळी सुरज याने सनीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात सनी गंभीर जखमी झाला.
हल्ल्यानंतर सनीला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. तरुण मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे.
या घटनेत सनीची आजी सुमनबाई तायडे यांच्या हातालाही दुखापत झाली आहे. सनीच्या मृत्यूची बातमी समजताच त्याची आई आणि आजी यांनी रुग्णालयात केलेला आक्रोश उपस्थितांचे मन हेलावून टाकणारा होता. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित सुरज वानखेडे याला ताब्यात घेऊन अटक केली. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. कौटुंबिक वादातून घडलेल्या या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.



