जळगाव

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई: नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त!

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई: नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त!

केशरयुक्त विमल पानमसाला अन् सुगंधित तंबाखूचा मोठा साठा हस्तगत; चाळीसगावचा चालक अटकेत

जळगाव (विशेष प्रतिनिधी): राज्य शासनाने बंदी घातलेल्या गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या अवैध वाहतुकीविरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई केली आहे. नाकाबंदीदरम्यान संशयास्पद वेगाने जाणाऱ्या इनोव्हा गाडीची झडती घेतली असता, त्यात तब्बल आठ लाख ३३ हजार सहाशे रुपयांचा केशरयुक्त विमल पानमसाला आणि व्ही-वन सुगंधित तंबाखूचा साठा मिळून आला. पोलिसांनी सात लाख रुपये किमतीची इनोव्हा कार आणि जप्त केलेल्या प्रतिबंधित मालासह एकूण पंधरा लाख ३३ हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून चाळीसगावच्या चालकाला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बारा ऑक्टोबर रोजी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कडक नाकाबंदी लावण्यात आली होती. दरम्यान, पहूर बाजूकडून चाळीसगावच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारी इनोव्हा ही गाडी पोलिसांच्या निदर्शनास आली. नाकाबंदीवर तैनात असलेले पोलीस नाईक दीपक पाटील, पोलीस कॉन्स्टेबल विकी इंगळे व डायल ११२ वरील मनोज महाजन यांनी गाडीला थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने पोलिसांचा इशारा दुर्लक्षित करून गाडी न थांबवता पुढे काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधान राखून सतर्कतेने गाडी अडवली आणि तिची पाहणी केली. गाडी उघडून पाहताच पोलिसांना त्यात गोण्यांमध्ये कोंबलेला प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला.

चौकशीदरम्यान वाहनचालकाने आपले नाव आबा विठ्ठल पाटील, वय ५४, रा. माऊली नगर, चाळीसगाव, जि. जळगाव असल्याचे सांगितले. या कारवाईत पोलिसांनी वाहनचालकाकडून आठ लाख ३३ हजार सहाशे रुपये किमतीचा प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला असून, वाहतुकीसाठी वापरलेली सात लाख रुपये किमतीची इनोव्हा कारही ताब्यात घेतली आहे; अशा प्रकारे एकूण पंधरा लाख ३३ हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने अन्न व औषध प्रशासन विभागाशी संपर्क साधला. अन्न सुरक्षा अधिकारी किशोर हिम्मतराव बाविस्कर यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात उपस्थित राहून सरकारतर्फे फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी आबा पाटील याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे करत आहेत.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या नेतृत्वात पार पडली.

या कारवाईत पोलीस नाईक दीपक पाटील तसेच पोलीस कॉन्स्टेबल विकी इंगळे, शाम हटकर आणि मनोज महाजन यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. जळगाव जिल्ह्यात अशाप्रकारे अमली व प्रतिबंधित पदार्थांची अवैध वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांची गय केली जाणार नाही; त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई अशीच तीव्रतेने सुरू राहील, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. तसेच नागरिकांना आपल्या परिसरात अशा अवैध धंद्यांची कोणतीही माहिती मिळाल्यास त्यांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा डायल ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button