
‘डिजिटल अरेस्ट’च्या धमकीने ७२ वर्षीय निवृत्त कर्मचाऱ्याला ५.२० लाखांचा गंडा!
‘अतिरेक्यांना पैसे पाठवले’ असा बनाव; पोलिसांच्या वेशातील भामट्यांनी व्हिडिओ कॉलवरून घातला सायबर फसवणुकीचा सापळा
जळगाव, प्रतिनिधी : अतिरेक्यांना तुमच्या बँक खात्यातून पैसे पाठवण्यात आले आहेत, तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात येत आहे, अशी धमकी देत सायबर भामट्यांनी पाचोरा येथील ७२ वर्षीय निवृत्त कर्मचाऱ्याला तब्बल ५ लाख २० हजार रुपयांचा गंडा घातला. पोलिसांच्या वेशात व्हिडिओ कॉल करून अटकेची भीती दाखवण्यात आली. या प्रकरणी १२ ऑक्टोबर रोजी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजयसिंग रामकृष्ण पवार (वय ७२, रा. जयकिसान सोसायटी, पाचोरा) असे फसवणूक झालेल्या निवृत्त कर्मचाऱ्याचे नाव आहे. २८ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबरदरम्यान ही फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तीन वेगवेगळ्या क्रमांकांवरून कॉल
मिळालेल्या माहितीनुसार, २६ सप्टेंबर रोजी पवार यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. समोरील व्यक्तीने कुलाबा पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचे सांगत महिलांना अश्लील संदेश पाठवल्याची तक्रार तुमच्याविरुद्ध दाखल झाल्याचा दावा केला. त्यानंतर काही वेळातच दुसऱ्या क्रमांकावरून फोन आला. या व्यक्तीने नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यात तुमच्याविरुद्ध तक्रार दाखल झाली असून, तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात येत असल्याचे सांगितले आणि फोन कट केला.
‘अतिरेक्यांशी संबंध’ असल्याचा बनाव
त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरून पवार यांना व्हिडिओ कॉल आला. पोलिसांच्या वेशात असलेल्या व्यक्तींनी पवार यांचे अतिरेक्यांशी संबंध असल्याचा तसेच त्यांच्या बँक खात्यातून अतिरेक्यांना पैसे पाठवण्यात आल्याचा आरोप केला. अटकेची भीती दाखवत, अटकेपासून वाचायचे असेल तर तातडीने ५ लाख २० हजार रुपये पाठवा, अशी मागणी करण्यात आली. यासाठी त्यांच्या व्हॉट्सॲपवर बँक खात्याचा तपशीलही पाठवण्यात आला.
पैसे पाठवल्यानंतर भामट्यांचे मोबाईल बंद
डिजिटल अरेस्टच्या धमकीला घाबरून विजयसिंग पवार यांनी आपल्या बँक खात्यातून संबंधित खात्यावर ५ लाख २० हजार रुपये वर्ग केले. त्यानंतर त्यांनी संबंधित तिघांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांचे मोबाईल बंद असल्याचे आढळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली.
या तक्रारीनुसार १२ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलीस करीत आहेत.




