जळगाव

विधान परिषद निवडणुकीसाठी जळगावात आचारसंहिता कक्ष कार्यान्वित

विधान परिषद निवडणुकीसाठी जळगावात आचारसंहिता कक्ष कार्यान्वित

आचारसंहिता भंगाच्या तक्रारींसाठी नागरिकांना संपर्काचे आवाहन

जळगाव | प्रतिनिधी

महाराष्ट्र विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक-२०२६ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.

अपर जिल्हाधिकारी तथा आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी डॉ. श्रीमंत हारकर यांच्या अध्यक्षतेखाली या कक्षाची स्थापना करण्यात आली असून निवडणूक प्रक्रियेदरम्यान आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्यास नागरिकांनी तात्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्ष वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हाभर विशेष देखरेखीची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. याअंतर्गत आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी व्हिडिओ सर्व्हेलन्स टीमची ३३ पथके तसेच फ्लाइंग स्क्वॉडची ३३ पथके नियुक्त करण्यात आली आहेत. ही पथके जिल्ह्यातील विविध भागांत सातत्याने निरीक्षण करून आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या घटनांवर लक्ष ठेवणार आहेत.

आचारसंहितेचा भंग आढळल्यास संबंधितांविरुद्ध निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आदर्श आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारींसाठी नागरिकांनी ०२५७-२२२०६०० या दूरध्वनी क्रमांकावर किंवा adcjalgaon@gmail.com या ई-मेलद्वारे संपर्क साधावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हारकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button