जळगाव

जळगाव आरटीओ कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी मशीन बसवण्याची मागणी; शिवशक्ती वाहतूक सेनेचे परिवहन मंत्र्यांना निवेदन!

जळगाव | प्रतिनिधी जळगाव येथील प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यालयात इन-आऊट थम्ब मशीन (बायोमेट्रिक हजेरी मशीन) लवकरात लवकर बसवण्यात यावी, अशी मागणी शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेना यांच्या वतीने करण्यात आली आहे.

शिवशक्ती वाहतूक सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशपाक शाह यांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना यासंदर्भात लेखी निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, जळगाव आरटीओ कार्यालयात अनेकदा अधिकारी व कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. ग्रामीण भागातील अनेक नागरिक आपल्या वाहनांची नोंदणी, लायसन्स रिन्यूअल, वाहनांवरील बँकेचा बोजा कमी करणे, पासिंग यासह विविध कामांसाठी आरटीओ कार्यालयात येतात. मात्र, एकाच अधिकाऱ्याकडे अनेक कामांची जबाबदारी असल्याने नागरिकांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागते.

तसेच काही अधिकारी नागरिकांशी उद्धटपणे वागत असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. नागरिकांच्या तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शासनाकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन दिले जात असतानाही नागरिकांची कामे वेळेत होत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत आरटीओ कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी मशीन बसवून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी अशपाक शाह यांनी केली आहे.

आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या निवेदनाची कितपत दखल घेतात आणि जळगाव आरटीओ कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी मशीन बसवण्याबाबत काय निर्णय घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

जळगाव मीडिया न्यूज नेटवर्क

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button